आजच्या तरुणांसाठी..
आजच्या तरुणांसाठी
आज तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तरुणांची शक्ती मोठी मानली जाते. 'लाथ मारेन तेथे पाणी काढेल' असे तरुणांचे सामर्थ्य असते. त्यांनी आपल्या जीवनातील अमूल्य वेळ योग्य मार्गी लावणे अत्यंत आवश्यक आहे. पण आता सोशल मिडीयाचा वाढता वापर पाहता जास्तीत जास्त तरुण हे सोशल मीडियावर वेळ वाया घालवताना दिसत आहे. अजूनही खूप काही होऊ शकते, वेळेचे महत्त्व समजून घेऊन वेळेचा सदुपयोग करावा. विश्वास असू द्या की तुम्ही सर्व जण महान कार्य करण्यासाठी जन्मास आला आहात. स्वतःवर विश्वास ठेवून ध्येयाने, जिद्दीने कामाला लागा. यश तुमचेच आहे.
साहसी बना, सामर्थ्यवान बना, लक्षात ठेवा आपणच आपल्या भाग्याचे निर्माते आहोत. त्यासाठी लागणारे सामर्थ्य तुमच्यात आहे. स्वतःचे भवितव्य स्वतः घडवा. यश संपादन करताना येणाऱ्या सर्व संकटांना धैर्याने तोंड द्या, संकटे ही आपल्यापेक्षा मोठी नसतात. सर्व महान कार्ये ही मोठमोठ्या संकटामधूनच साध्य होतात. नेहमी सत्याने वागणे यातच भले आहे यामुळे स्वतःचा आत्मविश्वास वाढत जातो. आत्मविश्वासाने केलेले कर्म यशस्वी होतेच. फसवणूक, लबाडी, धोका देऊन कोणतेही कार्य मोठे होत नाही. आत्मविश्वास, उत्साह, सत्यनिष्ठा यानेच महान कार्य होत असतात.
स्वतःचा विकास करण्याकडे लक्ष असुद्या.विकास म्हणजे जीवन होय,गती आणि वाढ ही तुम्ही जिवंत असण्याची लक्षणे आहे. वेगवेगळे धर्म,अंधश्रद्धा या सगळ्या विचारांनी आपला मेंदू शिणवू नका. दुर्बल मेंदू काही करू शकत नाही. मृत्यूशी सामना करण्याचीही हिम्मत ठेवा. ज्या लोकांच्या मनात भीती असते अशी भित्री माणसेच पाप करत असतात. धीट व्हा, प्रयत्नशील राहा. ध्येयवादी बना सर्व गोष्टींमध्ये चांगले शोधून घ्यावे, वाईट सोडून द्यावे. कोणाचेही बद्दल मनात राग न ठेवता सर्वांना माफ करून पुढे जाण्यातच तुमचं भल आहे...मनामध्ये प्रेम,शांती, दया, सहानुभूती यांना स्थान द्या. गरीब दीनदलितांची मदत करावी वृृृद्ध, अपंग व्यक्तींची सेवा करण्यात कधीही कमीपणा समजू नये. यातूनच प्राप्त झालेले पुण्य हे आपल्या प्रगतीच्या,यशाच्या मार्गात खूप मोलाचे ठरते.
आजच्या धकाधकीच्या जीवनात मनावरचा संयम कमी होऊ लागला आहे. मन सैरभैर धावत आहे, वाटेल तसं मोकाट सुटलेल मन आपला विनाश करण्या आधीच त्याला योग्य मार्गाला लावावे. त्या मनावर ताबा मिळवण्यासाठी प्राणायाम, ध्यान करणे गरजेचे आहे. जोपर्यंत आपल्या मनात स्वार्थी भाव नसतो तेव्हाच आपल्या हातून उत्तम कार्य होतात. आज्ञाधारकपणा, तत्परता, कार्याविषयी प्रेम या गोष्टी असेल तर तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही कोणाच्याही निंदेने घाबरू नका. स्वतःला कमी लेखु नका, स्वतःवर प्रेम करत राहा आणि तुमच्यातला क्षमता ओळखून आत्ताच कामाला लागा आणि जोपर्यंत ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबू नका...
..मोहिनी😊
Comments
Post a Comment